सोमवार, २४ सप्टेंबर, २००७

संतुसाठी मुलगी पाहिली.....

तशी मुंबई वरुन निघण्याआधीच सगळी तयारी केली होती(जय्यत!)। नवा ड्रेस!! cool! आणि जर सगळं काही व्यवस्थित जमलंच तर साखरपुडा पण आटपायचा असा माझा हेका होता(पोरगं वयात आलय ना! मी नव्हे... आमचा संतोष, संतुदादा...). सुट्टी तर अगदी दोन दिवसाची मिळाली होती, संतुचे काही ठरलेच तर साखरपुडा करायचाच .. आणि त्या नावावर आणखी एका दिवसाची सुट्टी काढायची असा माझा प्रामाणिक बेत!

भल्या पहाटे संकेश्वर मध्ये आमचे आगमन... मग गडहिंग्लजला प्रयाण॥ आणि माझे माझ्या गावी मु। लिंगनुर पो. मुंगुरवाडी ला प्रस्थान... घरी "श्रीं" चे आगमन माझ्याआधीच झालेले.. मस्तपैकी फ्रेश होउन, आरती वगैरे आटपुन संतुच्या घरी दाखल!! एका दिवसात ३ मुली पहायच्या होत्या. सकाळी उत्तुर..नंतर गडहिंग्लज, मग ऐनापुर असा बेत ठरला. पैकी उत्तुरला संतुची मावशी असल्यामुळे फक्त आम्ही दोघानीच तिकडे मुलगी बघण्यासाठी जायचे असे ठरले.

दुसर्या दिवशी ९ वाजता आम्ही गडहिंग्लज वरुन निघालो, उत्तुरमध्ये पोहचेपर्यंत आम्ही "मुलगी" या विषयावर आणि ती आमच्याप्रमाणे कशी असावी, कशी नसावी ह्यावर बरीच निश्फळ चर्चा केली। output काय?? कोण पदरात पडेल तीच छान ना!


मावशींच्याकडे पोहचल्यानंतर काकांनी मुलीच्या घरी फोन करुन सांगितले, "पाहुणे आलेत..", ... "हो..हो हो..".... "मुलगा... आणि त्यांचा मित्र "... "बर...". मुलगीच्या घरी आम्ही आल्याची कल्पना देउन आम्ही वाट पाहत बसलो.

मुलगी बी।एड. करत आहे. मुलींच्या घरचे म्हणतात की मुलगी नोकरी करणार. त्यातल्या त्यात 'एकतर लग्नानंतर मुलग्याकडच्यानी मुलगीला नोकरी लावायची नाहीतर आम्ही नोकरी लावतो . मगच लग्न' असं कांहीबाही आहे मुलीकडच्यांचं असं समजलं. मला तर काहीतरी वेगळेच वाटु लागले..."आयला! नोकरी" ... एकतर आमचा संतु साधाभोळा॥ त्यात मुलगी नोकरी करणार.. मग काय उदंडच ( पण , सध्या संतुची 'पत' वाढलीये म्हणे) "काय काय आहे ते तुम्हीच विचारायचे... लाजायचे नाही ", इती काकाश्री. संतु तर अगदी कुठे TCS च्या interview ला ऍपीयर होणार आहे असंच तोंड करुन बसला होता. मी पण विनाकारण घाबरत होतो. मुलगीला काय काय विचारायचे... नाव विचार... मग डीग्री कुठली... कुठले कॉलेज.. स्पेशल विशय कोणता ते विचार... हे सर्व मीच त्याला सुचवत होतो. "Be Brave बघायचे नाहीतर आहेच की ... पुढची..." हा माझा सरळ साधा विचार!!


तोपर्यंत मुलीच्या घरुन "या" म्हणुन बोलावणे आले। संतु, संतुचे काकाश्री, मामाश्री,ओळखीचे एक गृहस्थ आणि सगळ्यात लहान असा 'मी' मुलीच्या घरी आलो. समोरच्या गल्लीतच मुलगीचे घर असल्याकारणाने प्रवास हा प्रकार काही करावा लागला नाही.


एकापेक्श्या एक हात पाणी घ्या म्हनुन पुढे आले॥ त्यपैकीच एका हातातील तांब्या घेउन पायावर पाणी घेतले.. मी मुद्दामच वेळ करत होतो... सगळ्यात शेवटी घरात प्रवेश केला...


संतुच्या बाजुच्याच खुर्चीवर थोडासा तिरका होउन बसलो। आख्खी खोली मानसांनी भरली होती. सर्वजन अगदी .. आजोबा लोक.


काकश्रीनी, "हा मुलगा॥" अशी संतुची ओळख करुन दिली। सगळे डोळे भरुन भरुन संतुकडे पाहत होते. समोरच्या चौकटीवर दोन लहान मुले ...' हे एकंदरीत काय चाललय ' ह्याचा आंदाज घेत होती. बाजुच्याच चौकटीतुन आतील बायका.. हळुच डोकावुन नवरा मुलगा कसा आहे हे पाहत होत्या...

"मुंबईमध्ये कोणत्या कंपनीत असता आपण" .. कोठुन तरी प्रश्न आला ..
"रिलायंन्स मध्ये " , इति संतु। "काय काम करता आपण ॥" "मी सॉफ्ट्वेअर इक्झीक्युटीव्ह म्हणुन काम करतो तिथे.." इती संतु. "शिक्शण काय झालय .." "बी. कॉम. ..नंतर मग मी दोन वर्षे महालक्श्मी कॉम्पुटर्स मध्ये लेक्चरर म्हणुन काम केले. नंतर मग पुण्यात 'जावा' ची certification exam दिली.. ती exam म्हणजे ग्लोबल exam असते म्हणजे महाराष्ट्रापुरती किंवा भारतापुरती exam नसते.. ग्लोबल असते. ती exam दिली. नंतर पुण्यात ६ महिने काम केले.. नंतर आता Reliance मध्ये डाटाबेस(?) मध्ये काम करतो " संतुचा तोंड्पट्टा.

समोरचे काही अगदी, जावा, एस्क्युल मध्ये P.hD. केलेले लोक आहेत असच वाटलं असावं कदाचीत संतुला.

तोपर्यंत आतुन दोन आज्या आल्या... मुलगा कोनता ते पहायचं होतं त्याना.. "हा .. इथं इथं ..हाच मुलगा" ..दोघीपण अगदी टक लावुन संतुकडे बघितल्या... "हं..छान आहे हो"

आजी लोक मुलग्याला बघत आहेत हे पाहण्यासाठी दोन्ही चौकटीना एकदम गर्दी झाली.. प्रत्येकालाच मुलगा म्हणजे नेमका काय प्रकार असतो ते बघायची घाई लागली असावी कदाचित!


* * *

आजी लोक आत मध्ये गेल्यानंतर परत प्रश्न आला "तर डेटाबेस मध्ये काम करता आपण.." पाहुण्यानी कोनत्यातरी शिक्षकालाच मुलग्याविषयी जाणुन घेण्यासाठी आणले होते

"हो डेटाबेस मध्ये करतो.. म्हणजे क्युरीज वगैरे...मायक्रोसॉफ्ट SQL सर्व्हर २००५ मध्ये काम करतो...." परत संतु चालु झाला.... एव्हाना तो मास्तर पाव्हणा गार झाला होता.. कदाचित जरा जास्तच लक्षात आलं असावं त्याच्या.

मग मुलगी बाहेर येण्याची कुजबुज झाली। "इथे . . समोर बसुदेत..चालेल.."

'मुलगी' आली... समोर खुर्चीवर अगदी सावरुन बसली। परत एकदा दोन्ही चौकटी खचाखच भरल्या। मघाच्या आज्या पण आत येउन बसल्या. मग सगळं काही शांत झालं. चौकटीतुन सर्व बायका संतुकडे बघत होत्या... लहान मुले पण अगदी पुजेला बसल्यासारखी संतुकडे टक लावुन पाहत होती. संतुच्या काकानी शांतता भंग करत "विचारुन घ्या काय विचारायचं ते...." म्हणुन टाकले.

परत शांतता...

परत सर्वांचे लक्ष संतुकडे लागले।

"नाव कसे आपले....." , संतु विचारता झाला...

"माझे नाव, . . . . . . . . . . .  , मी सध्या बी. एड. करते", मुलगीने संतुकडे तिरकी नजर टाकत उत्तर दिले.

"बी. एड. कुठल्या कॉलेजमधुन", इती संतु.

"के। डी. शिंदे कॉलेज, गडहिंग्लज..."

थोडी शांतता....

"qualification काय आपले?(संतु Basic शब्द विसरला होता)" , संतुने विचारले

मला पण समजले नाही की हा काय विचारतोय

"तेच ना... बी. एड...." मुलगी नटक्या रागात बोलली... नटकाच का असतो राग ते मला तेंव्हा समजले।

"Basic Qualification म्हणजे त्याआधी काय केलेय.. बी. कॉम. की...." , इती संतु.

"बी.ए।"

"स्पेशल विषय कोणता होता"

"मराठी..."

संतुच्या प्रश्नाना पुर्णविराम. सगळीकडे शांतता झाली.

कितीतरी वेळ शांतता ... आणि शांतता.... बाकी काही नाही. काहीतरी वेगळेच वाटु लागले. इतकी वयस्कर लोक असुन देखील कोणीही काहीच बोलेना...

लक्ष संतु पुढचा प्रश्न काय करणार ह्याकडेच होते. पण काही केल्या संतुला काय विचारावं ते सुचेना. तोपर्यंत कुजबुज सुरु झाली. मग मीच संतुला हळुच सुचविले "कॉम्पुटर वगैरे काही केले आहे का विचार..."

"कॉम्पुटरचा कोनता कोर्स वगैरे केलाय का" , इती संतु

"MSCIT... "

"कोठुन॥means कोणत्या instituteमधुन" संतुला बहुतेक तेच महत्वाचे वाटले असावे।

"इथुनच की... उत्तुरमधुन"

आणखी परत एकदा शांतता पसरली. मला पण काही सुचेना.. काय विचारायचं.... बराच वेळ गेला... मग मुलीचे वडील पुढे होउन बोलले. "तुमचे विचारुन झाले असेल तर मुलगी आत जाउदे क..."

संतु लगेच म्हणाला " हो.. हो... झाले"।

मुलगी उठु लागली तोवर त्या आजींनी परत तिथेच बसायला सांगितले. मग थोडे थोडे इतर बोलणे होउ लागले. मुलगीला ५-७ जणीनी खणानारळाची ओटी भरली. यादरम्यान संतु... आणि मुलगी यांनी.. "हाच का... " "हीच का.." असं म्हणत चोरटया नजरेने एकमेकांना पाहुन घेतले.

मुलगी आत गेली. पाठोपाठ पोहे (!!!) पाठोपाठ चहा आला...आणि झाला पण..

"म्हैस कीतीला दिलास...." पैकी आज्जे लोकांना ते जानुन घेण्यात रस होता वाटतं. चहा घेता घेता त्यांच्यात चर्च्या चालु झाली.

"धा ला "...

"उगीचपण म्हटलं... नंतर आणि कुठं विकत बसायचं .. म्हणुन दिउन टाकली..."

"गावड्याची एक म्हस हाय बघ ... चांगली.."

"आता कुठं म्हशी घीत बसत्यासां... गवतं तरी कुठं हाईत घेवा..."

बरं असतं ह्या आजे लोकांचे... आपणच नाहीती चिंता करत बसतो.... IT चे भवितव्य काय? Saturation होणार का?... त्या आजे लोकांना ह्याबद्दल तसुभरही चिंता नसेल ना..??????

गवतं...म्हशी...गोठा....शेत आणि पाउस ह्याभोवतीच त्यांचे विश्व... छानच असतं ते देखील

* * *

मग मुलगीच्या वडिलानी संतुला विचारले.. "नाव कसे आपले॥???"

"मी संतोष लक्ष्मण नार्वेकर, मी रिलांयन्स मध्ये कामाला आहे." इति संतु

"शिक्षण ?"

"मी बी.कॉम. केलय.. नंतर........." संतुने परत एकदा सर्व काय ते सांगुन टाकले.... जावा... डेटाबेस.. ग्लोबल एक्झाम... ...
कोनीतरी संतुच्या हाती वही आणुन दिली. "तुमची माहीती आणि कंपनीचा पत्ता वगैरे लिहुन द्या"

मी ती वही घेउन लिहणार तोवर त्यांचा मुलगा पुढे होउन म्हणाला .." त्यांच्याच अक्षरात लिहुन द्या.." तो बहुतेक संतुचा होणारा मेव्हणा असावा.

संतुने ती वही घेउन .. आपली माहिती खरडुन काढली( खरडुनच म्हणायला हवी... लिहीली असं काही त्याला म्हणता येणार नाही!!!!)

परत बाकीचे लोक एकमेकांत बोलल्यानंतर संतुने काकांना सुचवले... "निघुयात ..."
मग सर्वांचा निरोप घेउन आम्ही घराबाहेर पडलो.
मावशींच्या घरी येउन पाणी घेतले व गाडीला kick मारली...

गडहिंग्लज येइपर्यंत.. मी संतुची त्याने वहीत खरडलेल्या गोष्टीवरुन बरीच खरडली...

मुलगी छान आहे...संतुने तिला फारच मनात घेतले असल्यामुळे आम्ही कांही दुसर्या मुली पाहिल्याच नाही...

अजुन तरी मुलींच्याकडचा होकार Status Pending दाखवतोय... बघु काय होतय ते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: